जेएनएन, मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आजपासून राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असून, सर्वच प्रमुख पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार थेट प्रचार मैदानात उतरले असून, विविध भागांत जाहीर सभा, दौरे आणि कार्यकर्ता मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे.

फडणवीसांची तोफ कोकणात धडाडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा प्रमुख केंद्रबिंदू कोकण विभाग असणार आहे. आजपासून त्यांच्या जाहीर सभा, रोड शो आणि बैठका कोकणातील विविध जिल्ह्यांत आयोजित करण्यात आले आहेत. भाजपसाठी कोकणात ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

एकनाथ शिंदेंचा मराठवाडा–पश्चिम महाराष्ट्र दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लातूर, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांत जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी वातावरण तयार करणे, स्थानिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असणार आहे.

अजितदादा बारामती तालुक्यात प्रचारात सक्रिय
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बैठका, पदयात्रा आणि सभा घेणार आहेत. बारामतीसह परिसरात महाविकास आघाडीतील तसेच विरोधी गटांना जोरदार टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सज्ज झाल्याचं चित्र आहे.

स्थानिक मुद्द्यांवर प्रचाराचा जोर
पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, शेतकरी प्रश्न, रोजगार आणि महिला–युवा सक्षमीकरण यांसारखे स्थानिक प्रश्न प्रचारात केंद्रस्थानी असणार आहेत. गावागावांत प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा, वाहन रॅली आणि डिजिटल प्रचाराचाही वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे.

    पुढील काही दिवसांत प्रचार शिगेला
    प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्याने पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. नेत्यांच्या तोफांचा आवाज, आरोप–प्रत्यारोप, विकासाच्या मुद्द्यांवरून चढाओढ आणि स्थानिक समीकरणांमुळे झेडपी–पंचायत समिती निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

    हेही वाचा: BMC Mayor: मुंबई महापौरपदाबाबत भाजप–शिवसेनेत एकमत; झेडपी निवडणूक प्रचारानंतरच महापौर निवड प्रक्रिया