जेएनएन, मुंबई. Thane Local Station News: मध्य रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकातील सतत वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी आणि रुंदी वाढवण्यात येणार असून, त्यामुळे लवकरच ठाण्यातून 15 डब्यांच्या लोकल गाड्या धावणार आहेत. ही कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
ठाणे स्टेशनवरील बदलांची माहिती
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 4 येथे विस्ताराचे काम होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची रुंदी 16.15 मीटर इतकी वाढवली जाणार आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 हे 40 मीटर रुंद करण्यात येणार आहेत. या विस्तारानंतर स्टेशनवर 15 डब्यांच्या लोकल गाड्या सहज थांबू शकतील, जे सध्या फक्त 12 डब्यांसाठीच शक्य आहे.
प्रवाशांसाठी फायदे
ठाणे हे मुंबई उपनगरातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दररोज सुमारे 5 लाख प्रवासी ठाणे स्टेशनवरून प्रवास करतात. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर होणारी चेंगराचेंगरी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
फलाट रुंदीकरणामुळे गर्दीचा ताण कमी होणार आहे.प्रवाशांच्या चढ-उतरणीस अधिक जागा मिळणार आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर व सुरक्षित बनेल.
रेल्वे प्रशासनाची भूमिका!
रुंदीकरणाचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. कामांच्या काळात प्रवाशांना कमीत कमी अडचण होईल याची दक्षता घेतली जाईल. आधी काही फलाटांवर तात्पुरते बदल करण्यात येतील, त्यानंतर कायमस्वरूपी रुंदीकरणाचं काम हाती घेतलं जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ठाणेकरांसाठी दिलासा!
या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सोप्पा, आरामदायक आणि गर्दीमुक्त होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकाचा हा विकास आगामी काळातील रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
