ठाणे. Pradeep Purnekar Murder Case: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडानंतर ठाणे शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दुसरीकडे, शहरातील नागरिकांनी एकत्र येत ‘भयमुक्त ठाणे’ मोर्चा काढला. या मोर्चातून नागरिकांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर शहरातील गुन्हेगारी कारवाया आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.
पोलीस आयुक्तांची भेट; महाविकास आघाडीकडून निवेदन
ठाण्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधत निवेदन देण्यात आले. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली.
दरम्यान, केवळ राजकीय पक्षांनीच नव्हे, तर सामान्य ठाणेकरांनीही या प्रश्नावर एकत्र येत आवाज उठवला. ‘भयमुक्त ठाणे’ मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी शहरातील सुरक्षेबाबतची चिंता व्यक्त केली. हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली.
‘यूपी-बिहारमधून मुलांना आणतात, गोळ्या घालतात’; अविनाश जाधव यांचा आरोप
‘भयमुक्त ठाणे’ मोर्चादरम्यान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून लहान मुलांना पकडून आणले जाते आणि गोळ्या घातल्या जातात, असा आरोप करत त्यांनी शहरातील गुन्हेगारी कारवायांवर प्रश्न उपस्थित केले.
