जेएनएन, ठाणे. Dombivli Crime News: डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने 7 वर्षीय मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानपाडा पोलिसांनी तातडीने पाच पथके तयार करून अवघ्या साडेतीन तासांत शहापूर येथून मुलाची सुटका केली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 2 आरोपी अल्पवयीन असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहे, अशी माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.

मुलाचे अपहरण

फिर्यादी कोमल महेश भोईर या त्यांच्या 7 वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी रोज रिक्षाचा वापर करत होत्या. मात्र, आज सकाळी 7:30 ते 9:07 वाजताच्या दरम्यान, एमएच 05 डीक्यू 9888 क्रमांकाच्या रिक्षातून जात असताना मुलाचे अपहरण करण्यात आले होते.

पाच तपास पथके तयार

आरोपींनी पैशांची मागणी करत पोलिसांना कळविल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. सकाळी 9:30 वाजता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. तक्रार मिळताच मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने पाच तपास पथके तयार केली.

    अवघ्या साडेतीन तासांत मुलाची सुखरूप सुटका

    तपासादरम्यान, मुलाला शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालक विरेन पाटील याच्यावर संशय बळावला. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने रिक्षाचा माग काढत पोलिसांनी शहापूर येथे शोधमोहीम राबवून अवघ्या साडेतीन तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी दोन प्रौढ आणि दोन अल्पवयीन अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.