जेएनएन, मुंबई. Mumbai Latest News: मुंबई शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः कूपर आणि केईएमसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक औषधं उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना खासगी मेडिकलमधून औषधं खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत असून, उपचारांमध्येही विलंब होत आहे.

औषधं मिळत नसल्याने रुग्ण त्रस्त!

रुग्णालयातील औषध वितरण केंद्रात अनेक औषधं ‘स्टॉकमध्ये नाहीत’ अशी पाटी लावलेली दिसत आहे. काही गंभीर आजारांसाठी आवश्यक असलेली अँटिबायोटिक्स, डायबेटिस, हृदयरोग, आणि कर्करोगावरील औषधं उपलब्ध नसल्याचं रुग्ण सांगत आहेत. “महापालिकेच्या रुग्णालयात येतो कारण इथे उपचार मोफत मिळतात, पण आता औषधं बाहेरून घ्यावी लागत आहेत. दररोज काहीशे रुपयांचा खर्च होतो,” अशी माहिती रुग्णानी दिली.

डॉक्टरही चिंतेत!

औषधांचा तुटवडा असल्याने डॉक्टरांनाही उपचार देताना अडचणी येत आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून पर्यायी औषधं सुचवली जात असली तरी ती सर्वांना परवडणारी नाहीत. “औषधांचा पुरवठा वेळेवर न झाल्याने उपचार प्रक्रियेत अडथळे येत आहेत,” असं केईएम रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे.

टेंडर प्रक्रियेमुळे अडकला पुरवठा 

    महापालिका प्रशासनाच्या मते, औषध खरेदीसाठी नव्या टेंडर प्रक्रियेमुळे काही दिवस पुरवठा अडकला आहे. नवीन पुरवठादारांशी करार पूर्ण होताच औषधांचा पुरवठा नियमित होईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून दिली आहे.