मुंबई. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना आता नवे वळण मिळाले असून, दिल्लीतील घडामोडींनंतर मुंबई महापालिकेतही कथित ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
किरण लांडगे यांनी दावा केला की, ठाकरे गटातील 20 हून अधिक नगरसेवक सध्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. हे नगरसेवक सातत्याने “पक्षात प्रवेश कधी करायचा?” याबाबत विचारणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लांडगे यांच्या मते, हे नगरसेवक अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) सामील झाल्यास मुंबई महापालिकेतील पक्षाची ताकद आणि राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
खासदारांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सुरुवातीला 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या घडामोडींची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायच्या असल्याने हा निर्णय काही दिवस पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.
राजकीय वर्तुळात आता 21 जूननंतर या संभाव्य विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित अडचणी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश संख्याबळाची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
ठाकरे गटाची भूमिका?
शिंदे गटाकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी पक्षातील नेते या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे समजते. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी यापूर्वीही पक्षफोडीच्या चर्चांना फेटाळून लावले असून, पक्ष संघटना मजबूत असल्याचा दावा केला आहे.
