मुंबई. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे सेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्होटचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार पलटवार केला. तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून त्यावेळी मुख्यमंत्री झालात. व्होटचोरीची भाषा तुम्ही करता मात्र खऱ्या अर्थाने व्होटचोरी 2019 मध्ये झाली. या राज्यातील मतदारांना शिवसेना भाजपाला मतदान केले आणि तुम्ही महाविकास आघाडीबरोबर सरकार स्थापन केले. तीच सगळ्यात मोठी व्होटचोरी होती. नव्हे डाका होता. दरोडा होता, असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही आम्हाला सांगता व्होटचोरी. जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले आहे. हरता तेव्हा म्हणता ईव्हीएम खराब आहे. अरे कर्नाटकात जिंकले, तेलंगणात जिंकले. केरळमध्ये जिंकले. तामिळनाडूत जिंकले. हिमाचल प्रदेशात जिंकले. तेव्हा काय झाले? व्होटचोरी नव्हती का?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केला. 

उद्या म्हणतील सरन्यायाधीशाची निवडणूक घ्या-

एकनाथ शिंदे यांनी देशभरात सुरू असलेल्या आंदोलने व मोर्चांवर टीका करत म्हटले की,  उद्या मोर्चा काढून म्हणतील की, सरन्यायाधीशांची, निवडणूक आयुक्तांची निवडणूक झाली पाहिजे. परवा म्हणतील महापालिका आयुक्तांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. अरे तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही कुठे निवडून आलात? मागच्या दाराने आलात आणि मुख्यमंत्री झालात, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा -

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल, अशी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी भाषणातच शिवसेनेच्या खासदार, आमदारांना लग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावांची यादी तयार करण्याचा आदेश दिला.

    शिंदे म्हणाले आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर आहे. 

    आम्ही शेतकऱ्यांना राशन देणारे आहोत. आम्ही परभणीत 25 हजार शिलाई मशिनींचे वाटप केले. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलींना 25000 सायकलींचे वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न असेल त्या लेकीचे लग्न करण्याची जबाबदारी शिवेसनेने घेतली आहे. सामूहिक विवाहसोळे आयोजित केले जातील.