मुंबई. Uddhav Thackeray Dasara Melava 2026: शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान देताना त्यांनी साबरमती कारागृहातील लॉरेन्स बिश्नोईचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांची मदत, महागाई, लोकशाही, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई आणि अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून सरकारवर सडकून टीका केली.

‘साबरमतीत तुमचा बाप बसलाय त्याला महाराष्ट्रात आणा’

टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. लॉरेन्स बिश्नोई साबरमती कारागृहात असल्याचा उल्लेख करत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना त्याला महाराष्ट्रात आणण्याचे आव्हान दिले. हल्लेखोर शस्त्रे घेऊन मुंबईत आले, तरी त्यांना वेळीच रोखण्यात यंत्रणांना यश का आले नाही, असा सवाल त्यांनी केला. या घटनेत टायगर श्रॉफ बचावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, अशा प्रकारच्या घटना घडत असताना पोलिसांची भूमिका आणि सुरक्षाव्यवस्थेची परिणामकारकता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पोलिसांना हे दिसले नाही का?

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्लाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणत्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आहात. पोलीस किंवा अन्य संस्था असतील त्यांनी यांची धुणी-भांडी करायचे ठेवले आहे, याचा संताप येतो. तुमची नाकाबंदी कशासाठी असते. नवरात्र सुरू आहे. आमच्याकडे कुठे काय खट्ट झाले की लगेच पोलीस स्टेशनला बोलावतात. पोलिसांना हे शस्त्र घेऊन येणारे गुंड दिसले नाहीत का, नाकाबंदीच्या वेळेस तुमच्या नाकात बोळे कोंबले होते का, ते शस्त्र घेऊन आलेच कसे, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना जीभ झडत नाही का?

    उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी आणि शहांनी 12 वर्ष देशाला छळलं आहे. आंदोलनाआधी पोलीस नोटीस पाठवत आहेत. आम्ही रेजीम चेंज करायला उभे आहोत. मुलांना घेऊन आईवडील आंदोलनात उतरले आहेत. मुलांचा आवाज समजून न घेतल्यास परिस्थिती वाईट होईल. तिरंगा रॅली काढणं गुन्हा आहे का? जंतरमंतरवर झेनजी गेले तेव्हा पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. 13 कोटी नागरिकांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला आहे. कुणी रस्त्यावर उतरला तर तुम्ही त्याला गुंड ठरवता, असं ठाकरे म्हणाले आहेत.

    एकनाथ शिदेंवर हल्लाबोल

    टायगर श्रॉफवर हल्ला झाला, हे चमकू लगेच गेले बघायला. 15 तासात गुंड पकडले त्याचं कौतुक करायचं की काय? जर त्या मुलाला गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मेलेली माणसं कधीच क्रांती करू शकत नाही, क्रांती ही मर्दाची असते, शांती ही मुडद्याची असते. खुराड्याच्या कोंबडीसारखा जगू नका, ही बाळासाहेब ठाकरे यांची वाक्य आज सुद्धा आठवतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाचा सुरुवात केली.