मुंबई. UBT targets Shah Rukh Khan : आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) च्या संघात बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला (Mustafizur Rahman) घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. देशातील धर्मगुरुंनी याचा निषेध केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानेही विरोध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी या मुद्द्याला जोडत बांगलादेश आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंना भारतीय भूमीवर आणि आयपीएलमध्ये सहभागी करून घेऊ नये, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

जर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्यांना खेळवले तर या लीगमध्ये कमावलेल्या पैशाचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी आणि आपल्या देशाविरुद्ध कट रचण्यासाठी वापरले जातील. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही, असे दुबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्यासोबत शाहरुख खान केकेआर फ्रँचायझीचा मालक आहे.

दुबे म्हणाले की, एक हिंदू, एक सनातनी आणि एक शिवसैनिक म्हणून आमचा याला विरोध राहील. बांगलादेशी खेळाडूला संघातून काढून टाकले तर शाहरुख खानचा आदर आणि सन्मान वाढेल. परंतु देशाच्या हिताला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती आम्ही खपवून घेणार नाही. 

शिवसेना (यूबीटी) नेते म्हणाले की त्यांचा पक्ष बांगलादेश आणि पाकिस्तानला शत्रू मानतो आणि पूर्ण बहिष्कार घालण्याची मागणी करतो. बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोघेही आपले शत्रू आहेत. त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याशिवाय आपण शांत राहणार नाही, असे ते म्हणाले.

दुबे पुढे म्हणाले की, शिवसेना (UBT) भारतात देशद्रोह्यांच्या" प्रवेशाला विरोध करेल आणि या मुद्द्यावर केंद्राचा पाठिंबा घेईल. आम्ही सरकारला आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करू, असे ते पुढे म्हणाले.

    संगीत सोम यांच्यासह भाजप नेत्यांनीही असेच आक्षेप घेतले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, शाहरुख खानने आयपीएल लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफुजूर रहमानला खरेदी केले होते.