जेएनएन, मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना अचानक तब्येत बिघडल्याने (Sanjay Raut Health Update) मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोग्य बिघडल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. त्या तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचं सुचवण्यात आले होते. काल सकाळपासून राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. 

त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय 

रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरकडून आवश्यक तपासण्या करत आहेत. डॉक्टरांनी पुढील 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकृतीविषयी व्यक्त केली चिंता 

    दरम्यान, संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते सतत संपर्कात आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असून, अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.