जेएनएन, भंडारा /सांगली: राज्यात काही भागांत पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र समोर येत आहे. विशेषतः सांगली आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अधिक तीव्र दिसून येत आहे.

सांगली जिल्ह्यात आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे पेट्रोलचा पुरवठा खंडित होणार, अशी अफवा वेगाने पसरली. या अफवेमुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही पंपांवर तासन्तास थांबूनही पेट्रोल मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

भंडारा जिल्ह्यातही सायंकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी दिसून आली. “पेट्रोल मिळणार नाही” या भीतीमुळे अनेकांनी एकाच वेळी टाक्या फुल करून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. त्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, काही पंप चालकांनी गेल्या चार दिवसांपासून पेट्रोलचे टँकर वेळेवर पोहोचत नसल्याची माहिती दिली आहे. पुरवठा साखळीतील अडचणी आणि वाढती मागणी यामुळे साठा कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र, अधिकृत स्तरावरून पेट्रोल टंचाईबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत असून, पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

अफवा आणि वास्तव यामध्ये फरक ओळखणं गरजेचं असून, अनावश्यक साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.