जेएनएन, मुंबई: आखाती देशांतील तणाव आणि विशेषतः इराण संदर्भातील युद्धस्थितीचा परिणाम आता थेट मुंबईच्या सर्वसामान्य जनजीवनावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इंधन आणि गॅस पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे शहरातील हॉटेल आणि खानावळींचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. मुंबई डबेवाले संघटना या जगप्रसिद्ध व्यवस्थेला सर्वात मोठा फटका बसला आहे.

मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी डबेवाल्यांची सेवा गेल्या दीडशे वर्षांपासून अखंड सुरू आहे. दररोज सुमारे 80 हजार ग्राहकांपर्यंत वेळेवर गरम जेवण पोहोचवणाऱ्या या व्यवस्थेत सुमारे 1500 डबेवाले कार्यरत आहेत. यामध्ये 70 टक्के ग्राहक घरगुती जेवणावर अवलंबून असले तरी उर्वरित 30 टक्के ग्राहक हे खानावळी व हॉटेलमधून येणाऱ्या डब्यांवर अवलंबून आहेत.

मात्र सध्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स आणि खानावळी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे या खानावळींवर अवलंबून असलेल्या ग्राहकांचे डबे थेट बंद झाले आहेत. माहितीनुसार, सुमारे 10 ते 15 टक्के ग्राहकांनी डबे सेवा थांबवली आहे, तर घरगुती डब्यांमध्येही सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे.

या परिस्थितीमुळे डबेवाल्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक डबेवाल्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोजंदारीवर चालणाऱ्या या व्यवस्थेला आर्थिक फटका बसत आहे. “खानावळी बंद असल्यामुळे आमचे अनेक नियमित ग्राहक कमी झाले आहेत. उत्पन्न घटल्याने कुटुंब चालवणे कठीण झाले आहे,” अशी भावना काही डबेवाल्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आखाती देशांतील युद्धस्थिती कायम राहिल्यास इंधन दरवाढ आणि पुरवठा साखळीतील अडचणी आणखी वाढू शकतात. त्याचा परिणाम केवळ हॉटेल व्यवसायावरच नव्हे, तर वाहतूक, अन्नपुरवठा आणि इतर सेवा क्षेत्रांवरही होण्याची शक्यता आहे.

मुंबईसारख्या महानगरात डबेवाल्यांची सेवा ही केवळ व्यवसाय नाही, तर एक सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे या व्यवस्थेला सावरण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.