एजन्सी, ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत चार दिवसांच्या भिवंडी दौऱ्यावर (Mohan Bhagwat On Bhiwandi Tour) आले आहेत. या दौऱ्यात ते या भागातील विविध शांखांना भेट देतील आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका

Mohan Bhagwat हे भिवंडीत असल्यानं या भागातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. त्यांच्या मुक्काम हा भिवंडीत असणार आहे. ते या भागातील शाखांना भेट देतील, आणि  कोकण प्रदेशातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतील, असे आरएसएसचे भिवंडी युनिट सचिव विजय वल्लाळ यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना करणार संबोधित 

त्यांनी सांगितले की, संघाचे प्रमुख 26 जानेवारी रोजी एका महाविद्यालयात ध्वजारोहण समारंभात सहभागी होतील आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

    स्थानिक स्वराज्य संस्थेवर लक्ष्य?

    आरएसएस संघटनेच्या स्वयंसेवकांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुती सरकारच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. विशेषत: मुंबई महानगरपालिकेसह कोकण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपानं पकड बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा आरएसएचे स्वयंसेवक काय भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई पालिका निवडणुकीबाबत निर्णय होणार?

    मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. भाजपाचे नेते अनेक दिवसांपासून या निवडणुकीची तयारी करत आहेत. यातच आता थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईचे उपनगर असलेल्या भिवंडीत चार दिवसांसाठी मुक्कामी आहेत. त्यामुळे आरएसएस मुंबई पालिका निवडणुकीबाबत काही महत्त्वाचा निर्णय घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना अक्टिव्ह करु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.