जेएनएन, मुंबई. Mumbai News: राज्याच्या आणि विशेषत: कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचा मानल्या जाणारा रेवस ते रेड्डी हा सागरी मार्ग (Revas to Reddy Marine Highway) अद्याप अपूर्णच आहे. 523 किलोमीटर लांबीचा हा चार पदरी सागरी महामार्ग बनवण्यासाठी मागील 30 वर्षापासून मागणी होत आहे. यासंदर्भातील एक प्रश्नाला विधानसभेत मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून पुढील 3 वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

भाजप आमदाराची सभागृहात माहिती

रेवस ते रेड्डी या चारपदरी सागरी महामार्गाचे काम 30 वर्षांपासून अपूर्ण असून, खर्च हा 10,000 कोटींवर गेला असल्याची बाब भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत निदर्शनास आणून दिली.

26 हजार 463 कोटी रुपये खर्च येणार

यावर बोलताना हा महामार्ग काही ठिकाणी साडेपाच मीटर तर काही ठिकाणी सात मीटर रुंदीचा आहे. तो चारपदरी केला जाणार असून तो पूर्णत: नवीन केला जाणार असल्याने खर्चात वाढ झाल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 523 किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी 26 हजार 463 कोटी रुपये खर्च येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

    रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन 

    साधारणपणे रायगड जिल्ह्यातील 26, रत्नागिरी जिल्ह्यातील 36 आणि सिंधुदुर्गातील 31 पर्यटनस्थळे या महामार्गाला जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचाही अभ्यास करण्यात येत आहे. सर्व बाजूंचे निराकरण करून ‘MSRDC’च्या मदतीने येत्या 3 वर्षांत हा रस्ता पूर्ण करण्यात येईल, असं भुसे यांनी सभागृहात दिली. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे, असं ते म्हणाले.

    पहिल्या टप्यात

    पहिल्या टप्प्यात रेवस, करंजा, रेवदंडा, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड, काळबादेवी, कुणकेश्वर हे 9 पूल प्रस्तावित असून त्यासाठी 9,105 कोटी रुपये खर्च येणार आहे. यांपैकी पाच पुलांचे कार्यादेश काढण्यात आले असून, दोन पुलांचे कंत्राट देण्यात आले आहे. दाभोळ आणि काळबादेवी पुलासदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    दुसऱ्या टप्प्यासाठी 17,357 कोटी रुपये खर्च येणार

    दुसऱ्या टप्प्यात रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यासाठी 17 हजार 357 कोटी रुपये खर्च येणार आहे. रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.