जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: कॉंग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल 

यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.  चंद्रकांत दायमा यांचे काम एकत्रित कॉंग्रेस असताना एकदम जवळून पाहिले असल्याचे सांगतानाच सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आणि आज ती शिस्त पुढे नेत आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना समज

आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये भान ठेवून वक्तव्य करा, अशी स्पष्ट शब्दात समज अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

    यांनी केला प्रवेश

    जाहीर प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रीय संघटक शशिकांत थोरात, मराठवाडा प्रदेश संघटक जयंत काथवटे, लातूर जिल्हा प्रदेश संघटक बिरबल देवकाते, उस्मानाबाद संघटक विलास साळू, जालना संघटक मंत्री शरद देशमुख, छत्रपती संभाजीनगर संघटक प्रकाश पडवळ, नागपूर संघटक चंद्रकांत नवघरे, आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

    काँग्रसेला मोठं खिंडार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील कॉंग्रेस सेवादलाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम महिला विकास मंडळ सभागृह येथे पार पडला. यावेळी परभणीतील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.