जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राचे राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार मीना (Rajesh Kumar Meena) आज आपला पदभार सांभाळणार आहेत. सुजाता सौनिक काल महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव (Maharashtra Chief Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांची निवड करण्यात आली आहे. मीना आजपासून राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळणार अशी माहिती देण्यात आली आहे.
राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.

राजेशकुमार मीना यांच्याविषयी
राजेशकुमार मीना हे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
असा आहे मीना कार्यकाळ !
1988 बॅचचे सनदी अधिकारी राजेशकुमार मीना ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.