जेएनएन, मुंबई. Maharashtra Vidhan Bhavan Clash Incident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्तामध्ये विधानभवनात हाणामारी झाली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?', असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्वीटमधून उपस्थीत केला आहे.
'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?' असाही प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या X वरुन जनतेला विचारला आहे.
आता कुठे लपून बसलेत?
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का?
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ…
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की, या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की, जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
— Raj Thackeray (@RajThackeray) July 18, 2025
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे…
राजकीय कार्यकर्त्यांना बंदी घालण्याचे निर्देश
गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनच्या लॉबीतच मारहाण केली. या प्रकरणामुळे विधानभवन सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विधानभवन परिसरात राजकीय कार्यकर्ता प्रवेशची बंदी घातली आहे. सुरक्षाच्या कारणांमुळे राजकीय कार्यकर्त्यांना बंदी घालण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.