जेएनएन, मुंबई. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या परिसरात धिंगाणा (मारहाण) झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला बघायला मिळाला. काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधान भवनाच्या परिसरातच बाचाबाची झाली होती. गाडीच्या दाराला धक्का लागल्याच्या कारणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ देखील केली होती. 

यातच आता विधिमंडळामध्ये हा राडा झाला आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसून आली. यामुळे विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी आव्हाड चांगलेच संतापले होते. विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत. असं असेल तर आमदार कशाला राहायचं? असा संतप्त सवाल आव्हाड यांनी यावेळी केला. 

आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या

अख्ख्या महाराष्ट्राला समजलं आहे की, पडळकरांच्या लोकांनी हल्ला केला. आम्हाला यापेक्षा जास्त कोणताही पुरावा द्यायचा नाही. तुम्ही विधानपरिषदेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करत असतील तर आम्ही सुरक्षित नाहीयेत, असा त्याचा अर्थ होतो, असा प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मी सुरक्षित नसल्याचे ट्वीट अगोदरच केलेले आहे. मला आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या. तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. कुत्रा, डुक्कर असं काहीही बोलण्यात आलं, असंही यावेळी आव्हाड म्हणाले. 

विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर…

    विधानसभेत नेमकं काय चालू आहे? मी भाषण करून बाहेर आलो होतो. थोडी मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर आलो होते. हे गुंड मलाच मारण्यासाठी आले होते. म्हणजे विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार. आमचा गुन्हा काय? असाही प्रश्न आव्हाड यांनी केलाय. 

    सत्तेचा एवढा माज चढला की…

    कोणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आई-बहिणीवरून शिव्या देतो तर अशा भाषेला अधिकृत भाषा म्हणून जाहीर कारा ना. सत्तेचा एवढा माज चढला आहे, अशी कठोर टीका आव्हाड यांनी केली. 

    हे गुंड विधानभवनात आलेच कसे? - उद्धव ठाकरे 

    या प्रकारावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाच्या बाहेर अशा घटना आणि विधिमंडळाच्या प्रांगणात हे प्रकार घडणे यात फरक आहे, हे गुंड विधानभवनात आलेच कसे? त्यांना पास कसा मिळाला? त्यांना पास देणारा आमदार कोण? याबाबत चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

    हेही वाचा - Uddhav Thackeray: फडणवीसांची काल ऑफर! आज ठाकरेंनी घेतली थेट भेट, राजकारणात नेमकं सुरु आहे काय? वाचा सविस्तर