जेएनएन, मुंबई. दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ आज मुंबईत परतणार आहे. या शिष्टमंडळात मनसेचे वरिष्ठ नेते आणि कायदेशीर सल्लागार सहभागी होते. शिष्टमंडळने आयोगासोबत झालेल्या चर्चेतील घडामोडी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे राज ठाकरे यांना सविस्तरपणे सादर करणार आहेत.
आयोगाकडे तक्रारी
माहितीनुसार, बैठकीत मतचोरी, मतदार यादीतील घोळ, मतदाराचा पत्ता, मतदार यादी दुरुस्तीवर निवडणूक आयोगाकडे तक्रारी मांडल्या आहेत. या तक्रारीवर आयोगाने कोणती भूमिका घेतली, याबाबतचे तपशील आज राज ठाकरेंना देण्यात येणार आहे.
राज ठाकरेंची आज ठरणार रणनिती
राज ठाकरे आज या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, निवडणूक आयोगसोबतच्या बैठकीचा परिणाम पुढील काही दिवसांत दिसून येणार आहे. पक्षाच्या निवडणूक रणनितीबाबत काही मोठे निर्णय राज ठाकरे स्वतः घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…’, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
