मुंबई -Raj-Uddhav Thackeray PC:  शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी रविवारी मुंबईत दोन्ही पक्षांनी आयोजित केलेली रॅली ठरल्याप्रमाणेच होईल, असे म्हटले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुणांनी देशाला 'भीतीच्या वातावरणातून' बाहेर काढले आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केवळ प्रधान यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एक मच्छर आदमी को… हा यशवंत चित्रपटातील डायलॉग हाणला व म्हटले की, पुढचे मी काही बोलत नाही. तरुणांनी देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढले आहे... एका झुरळाने हुकूमशहाला नतमस्तक केले आहे. "ज्यांनी तरुणांना झुरळे म्हटले, त्यांनी अंहकार बाळगू नये, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजप सरकारने देशात असा भ्रम निर्माण केला होता की, देशात आता नागरिक उरलेलेच नाहीत, ती केवळ झुरळे आहेत. परंतु, या एका 'झुरळाने' (सामान्य विद्यार्थ्याने) हुकूमशाही सरकारला झुकवून दाखवले आहे. हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याशी बोलून ते काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खोचक टीका करताना सरकारवर टीकास्त्र सोडलं.  जेन जीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे.’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य करत सरकारला सणसणीत टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, तरुणांचा हा जो रोष आहे तो प्रधानांवरून पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे, मी कालच हे म्हटलं होतं. यापुढे अभिजीत दीपके जे निर्णय घेतील , त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असंही राज ठाकरे म्हणाले.

    उद्याचा मोर्चा होणारच -

    राज ठाकरे म्हणाले की, प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि तरुणांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मूळतः रविवारी शिवाजी पार्क येथे नियोजित असलेली रॅली ठरल्याप्रमाणे होईल. उद्या केवळ या तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी जल्लोष रॅली काढली जाईल.