मुंबई. मुंबईतील शिवतीर्थ (शिवाजी पार्क) हे पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा मोर्चा’ यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शनिवारी दिवसभर बैठका, समन्वय आणि संपर्क मोहिमेला वेग आला.
मोर्चाची रणनीती अंतिम करण्यासाठी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे सविस्तर चर्चा झाली. मोर्चाचा मार्ग, सुरक्षा, गर्दीचे नियोजन, विविध पक्षांचा सहभाग आणि आंदोलनाची दिशा यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेच्या बैठकीत काय ठरलं?
माहितीनुसार, मनसेच्या अंतर्गत बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
* मोर्चात फक्त तिरंगा ध्वज वापरण्यावर भर देण्यात आला.
* कोणत्याही पक्षाचे झेंडे किंवा राजकीय घोषणा टाळण्याचे निर्देश देण्यात आले.
* आंदोलन पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित ठेवण्याचे ठरविण्यात आले.
* मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
* शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर स्वयंसेवक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शरद पवारांनाही फोन
मोर्चाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच काँग्रेसलाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे.
राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश
मोर्चा कोणत्याही राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मोर्चादरम्यान कोणतीही घोषणाबाजी, पक्षीय झेंडे किंवा नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा होऊ नयेत, असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवतीर्थ ते सिद्धिविनायक
रविवारी सकाळी शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. या मोर्चात विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना तसेच विविध विरोधी पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रशासनानेही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्ताची तयारी केली आहे.
