जेएनएन, मुंबई. मुंबईतल्या गोरेगाव येथे नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली. तसंच महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मागील विधानसभा निवडणुकीवर टीका
‘आत्ताही विधानसभेची निवडणूक झाली 223 आमदार निवडून आले आहेत. एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक झालेच होते पण निवडून आलेलेही आवाक झाले होते. कारण त्यांनाही कळलं नाही कसा निवडून आलो. मग सगळ्यांनाच समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत. कसे विजय मिळतात, कसं यश मिळतं ते कळलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये रुपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात. असं केलं तर कशी काय मिळेल मतं?’ असं ते म्हणाले.
96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले
‘मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी 1 जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत 8 ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे. अशा प्रकारे निवडणुका होणार का? ही कोणती लोकशाही आहे?’ असं राज ठाकरे म्हणाले.