जेएनएन, मुंबई. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आज पार पडत आहेत. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज संबंधित महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
निवडणुका शांततेत, निर्भय आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी मुंबई पोलीस, स्थानिक पोलीस दल, निवडणूक यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज आहेत. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त, पथकांची तैनाती, तसेच ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे.
मात्र नागरिकांमध्ये एकच प्रश्न आहे — आज नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू असणार? चला, सविस्तर जाणून घेऊया…
सार्वजनिक सुट्टी कुणाला लागू?
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,
मुंबईसह ज्या 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होत आहे, त्या क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.ही सुट्टी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये,खाजगी आस्थापना, कंपन्या, दुकाने, कारखाने (मतदान क्षेत्रात येणारे)तसेच मतदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. यामागचा उद्देश स्पष्ट असून कोणताही मतदार कामामुळे मतदानापासून वंचित राहू नये.
शाळा-कॉलेजचं काय?
बहुतांश ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक शाळा या मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. काही भागांत ऑनलाईन वर्ग किंवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सरकारी आणि खासगी कार्यालयं!
- सरकारी कार्यालये – बंद (अत्यावश्यक सेवा वगळता)
- महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय आस्थापना – बंद आहे.खासगी कंपन्या, दुकाने, कारखाने – मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवेतन सुट्टी बंधनकारक केले आहे.
- मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.
काय सुरू असणार?
सार्वजनिक सुट्टी असली तरी खालील अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत —
रुग्णालये, दवाखाने, औषध दुकाने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस, सुरक्षा यंत्रणा, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता सेवा, सार्वजनिक वाहतूक (बेस्ट, एसटी, रेल्वे सेवा)
मात्र काही ठिकाणी कर्मचारी मतदानासाठी गेल्यामुळे सेवांवर मर्यादित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस व निवडणूक यंत्रणा सज्ज
मुंबईसह राज्यभरात हजारो पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथके, होमगार्ड, केंद्रीय सुरक्षा दल, यांची तैनाती करण्यात आली आहे.
संवेदनशील प्रभागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रोख रक्कम, दारू, आमिषांवर करडी नजर ठेवली जात आहे.
आयोगाचं आवाहन
राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केलं आहे की,“घराबाहेर पडा, निर्भयपणे मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा.”
