जेएनएन, मुंबई. Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 10 ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. पत्राच्या 4 दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे सांगितले आहे.

आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते. आज 14 ऑगस्ट आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

आंबेडकर यांनी सांगितले की, यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजी त्यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही.

आंबेडकर म्हणाले की, जर राहुल गांधी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे "गुपीत" आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती.

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असे त्यांनी सुचवले आहे.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे. आंबेडकरांच्या या पत्रानंतर, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    हे ही वाचा -Uddhav Thackeray : निकाल लवकर द्या; न्याय न मिळाल्यास लोकशाही मरून जाईल, उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती