जेएनएन, मुंबई: राज्याच्या राजकारणात येत्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत आहे. निवडणुकीस शंभर दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाला सज्ज राहण्याच्या स्पष्ट सूचना दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या सूचना
मनसेसोबत युतीबाबतचा निर्णय- मनसेसोबत युती करायची की नाही, हा निर्णय आम्ही वरच्या पातळीवर घेऊ, पण तुम्ही तयारीला लागा, असे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मतदारांशी संपर्क अभियान - निवडणुकीत फक्त शंभर दिवस उरले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने लोकांच्या संपर्कात राहावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.
दुबार मतदानावर लक्ष - मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होऊ देऊ नका, याबाबत दक्ष राहा.
भूलथापांना बळी पडू नका - विरोधकांकडून अनेक आश्वासने दिली जातील, अफवा पसरवल्या जातील; त्यांना बळी पडू नका.
पक्षातील ऐक्य - आपापसातील मतभेद, हेवेदावे विसरून संघटनेला प्राधान्य द्या.
हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; GR रद्दची याचिका फेटाळली
31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच इतर अनेक कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. म्हणजेच, आता महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होणार आहे.