रायगड. Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि इतर प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून उड्डाणपुलांच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी महामार्ग टोलमुक्त करण्यात आला असला तरी रस्ता खड्डेमुक्त कधी होणार? असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही ठिकाणी उड्डाणपूल आणि मुख्य मार्गाची कामे सुरू असल्याने वाहनांना पर्यायी सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत आहे. मात्र, या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉकचा तात्पुरता उपाय-

महामार्गावरील काही ठिकाणी खड्डे बुजविण्याऐवजी त्यावर पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, हा उपाय कितपत टिकाऊ आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात चिखल आणि पाण्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला, तर आता पाऊस कमी होऊन ऊन पडू लागल्याने रस्त्यावरील धुळीने प्रवाशांची डोकेदुखी वाढवली आहे.

वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे धुळीचे मोठे लोट उडत असून दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. खड्डे चुकविताना वाहनांचा वेग कमी करावा लागत असल्याने प्रवासाचा वेळही वाढत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून लांबच्या प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवात कोकणवासीयांची मोठी गैरसोय-

    गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या भागांतून हजारो चाकरमानी कोकणात जात असतात. या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. प्रवाशांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी टोलमुक्तीचा निर्णय घेण्यात आला असला तरी खराब रस्त्यांमुळे प्रवास सुखकर होण्याऐवजी अधिक त्रासदायक ठरत असल्याची प्रवाशांची भावना आहे.

    “टोलमुक्तीचा निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र प्रवाशांना चांगला आणि सुरक्षित रस्ता मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. टोलमुक्ती झाली, पण महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार?” असा सवाल प्रवासी आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.

    अपघाताचा धोकाही वाढला

    मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती अधिक गंभीर असून खड्डे चुकविताना तोल जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने तात्पुरत्या उपायांऐवजी खराब झालेल्या सर्व्हिस रोडची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि धुळीच्या त्रासावरही प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.