जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Mumbai Tourist: राज्यातील रहिवासी असलेल्या व जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या जवळजवळ 75 पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने मुंबई विमानतळावर सुखरूप पोहचली. आज गुरूवार पहाटे 3.30 वाजता मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने - Terminal 1 वर हे विमान उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाद्वारे जम्मू-काश्मीर मधील प्रवाशांना सुखरुप घरी आणले आहे. शिंदे यांच्या जनतेला संकटात तत्पर मदत करण्याच्या संवेदनशील स्वभावामुळे या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई  विमानतळावरून बाहेर पडताना कश्मीर मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीवघेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटकेचा निश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता.

एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

मुंबईत सुरक्षित पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तसेच महायुती सरकारने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त केले.