जेएनएन, मुंबई. मुंबईत रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून आता वाद पेटला आहे. मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याने कांदिवली पश्चिम परिसरातील अमराठी रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ परप्रांतीय रिक्षा चालकांनी कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड परिसरात रास्तारोको करत रिक्षा सेवा बंद ठेवली.

अचानक रिक्षा चालकांनी संप पुकारल्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. प्रवाशांना रिक्षा मिळत नसल्याने अनेकांना बस किंवा अन्य पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. सकाळच्या वेळेत रिक्षा बंद असल्याने प्रवाशांची महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली.

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली असून, मराठी भाषा येत नसलेल्या चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाई केली जात आहे. यामुळे अनेक अमराठी रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईला विरोध करत चालकांनी रस्त्यावर उतरून परिवहन विभागाविरोधात आंदोलन सुरू केले.

दरम्यान, कांदिवली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षा सेवा पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले. मात्र, परिवहन विभागाच्या कारवाईची भीती कायम असल्याने अनेक रिक्षा चालकांनी आपली वाहने बंदच ठेवली.

या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयावरून सुरू झालेल्या या वादाचे पुढील पडसाद मुंबईतील इतर भागांतही उमटण्याची शक्यता आहे.