मुंबई. Local Mega Block: मुंबईतील महत्त्वाच्या एल्फिन्स्टन पुलाच्या (Elphinstone bridge) पुनर्बांधणी आणि जोडणीच्या कामासाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गांवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात मध्य रेल्वे मार्गावर प्रत्येकी दोन तासांचे एकूण 19 रात्रकालीन ब्लॉक घेऊन पुलाच्या गर्डरचे कंटिग आणि जोडणी काम करण्यात येणार आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून ब्लॉकचे अंतिम वेळापत्रक निश्चित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्लॉकचा कालावधी मुख्यत्वे मध्यरात्रीच्या सुमारास ठेवण्यात येणार असून, दैनंदिन लोकल सेवा आणि प्रवाशांवरील परिणाम कमीत कमी राहील, याची दक्षता घेतली जाणार आहे.
दरम्यान, एल्फिन्स्टन पुलाचा पश्चिमेकडील जुन्या संरचनेचा सांगाडा हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेवरही विशेष ब्लॉकची आवश्यकता आहे. यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत समन्वयाची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही रेल्वे मार्गांवरील काम एकाच वेळी किंवा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत चर्चा सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाकडून कामाच्या काळात प्रवाशांना पर्यायी व्यवस्था, वेळापत्रकातील बदलांची आगाऊ माहिती आणि आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत. एल्फिन्स्टन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.
