जेएनएन, मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत निवासस्थानावरील खर्च पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान परिसरातील ऐतिहासिक ‘कौलारू’ महापौर बंगल्याच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण होण्याआधीच लगेचच आणखी जवळपास 3 कोटी रुपयांच्या नव्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापौरांच्या बंगल्यावर नेमका किती खर्च होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या नव्या कारभारात महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाला आधुनिक स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. भायखळ्यातील हा बंगला ऐतिहासिक वारसा असलेला असून, त्याची रचना आणि मूळ स्वरूप जपून दुरुस्ती करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, वारसा संवर्धनाच्या नावाखाली बंगल्याच्या अंतर्गत सजावटीवर आणि सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने आता या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. 

आधी कोट्यवधींचं नूतनीकरण, आता पुन्हा नव्या कामांचा प्रस्ताव 

महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी यापूर्वी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता जवळपास 2.9 कोटी रुपयांच्या नव्या सुशोभीकरण आणि सुधारणा कामांसाठी निविदा काढण्यात आली आहे. म्हणजेच काही महिन्यांच्या कालावधीत बंगल्याच्या नूतनीकरणासाठी होणारा एकूण खर्च पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी बंगल्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावात इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य भागाची रंगरंगोटी, लाकडी संरचनेची दुरुस्ती व पॉलिशिंग, छताची देखभाल, विद्युत यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि अंतर्गत सजावटीची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. ऐतिहासिक वास्तूचे जतन आवश्यक असले तरी वारंवार होणाऱ्या खर्चामुळे या कामांची गरज आणि नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

‘साधा बंगला की आलिशान निवासस्थान?’ 

    महापौरांचा अधिकृत बंगला हा केवळ निवासासाठी नसून, विविध शासकीय बैठका, प्रतिनिधींच्या भेटी आणि महापौरांच्या अधिकृत कार्यक्रमांसाठीही वापरला जातो. त्यामुळे त्याची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती करणे महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, काही महिन्यांतच पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रस्तावित झाल्याने हा खर्च केवळ आवश्यक दुरुस्तीपुरता मर्यादित आहे की बंगल्याला अधिक आलिशान स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.