जेएनएन, मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी (EVM) पारंपरिक बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकशाहीच्या मुळाशी संबंधित असून त्यात सर्वसामान्य मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मात्र, EVM संदर्भात विविध स्तरांवर संशय, शंका आणि तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणि पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे अधिक योग्य ठरेल.
“ग्रामीण भागातील अनेक मतदार आजही EVM बाबत संभ्रमात आहेत. काही ठिकाणी मशीन बिघाड, मत नोंदणीबाबत तक्रारी, तसेच निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी आणि मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी बॅलेट पेपर हा अधिक विश्वासार्ह पर्याय आहे,” असे पटोले यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट गावागावातील प्रश्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, शेती यांसारखे विषय केंद्रस्थानी असतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणताही संशय न राहता, पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने मतदान होणे आवश्यक आहे. बॅलेट पेपर पद्धतीमुळे मतमोजणी प्रक्रियाही अधिक स्पष्ट, समजण्यास सोपी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडते, असा युक्तिवादही त्यांनी निवेदनात केला आहे.
हेही वाचा - मुंबईत पुन्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स! BMC निवडणुकीनंतर शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले, काही मोठे घडणार का?
राज्य निवडणूक आयोगाने व राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
