जेएनएन,मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी मुंबई मनपाची निवडणूक ही “मुघलांबरोबर दिलेल्या लढाईसारखी” असल्याची तीव्र उपमा दिली. तसेच, “मुंबई दोन गुजरातींच्या हातात द्यायची नाही” असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला.
मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, मुंबईच्या अस्मितेची आणि मराठी माणसाच्या हक्कांची लढाई असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. “जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढाई दिली, तशीच ही मुंबई वाचवण्याची लढाई आहे. ही निवडणूक हलक्यात घेऊ नका,” असे स्पष्ट निर्देश उमेदवारांना दिले.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मुंबईवर बाहेरच्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती कुणाच्या दावणीला बांधायची नाही. दोन गुजराती उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या राजकीय पाठीराख्यांच्या हातात मुंबई देण्याचा प्रश्नच येत नाही,” अशी थेट टीका ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर केली.
महापालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या आर्थिक, प्रशासकीय आणि विकासात्मक निर्णयांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मुंबईची तिजोरी, जमीन आणि महत्त्वाचे प्रकल्प कुणाच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. हे रोखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,” असे सांगत त्यांनी उमेदवारांना आक्रमक प्रचार करण्याचे आवाहन केले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची परंपरा, मुंबईतील सेनेचे योगदान आणि मराठी माणसासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. “ही निवडणूक जिंकणे म्हणजे सत्तेसाठी नाही, तर मुंबईच्या स्वाभिमानासाठी आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: Municipal Election 2026: देवेंद्र फडणवीस आज मनपा प्रचाराचा नारळ फोडणार; महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ
