जेएनएन, सातारा: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला आजपासून अधिकृत सुरुवात होत असून, महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आज सांगली येथे आयोजित पहिल्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री फडणवीस महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा ‘नारळ फोडणार’ आहेत. या सभेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकांच्या प्रचारासाठी आज सांगलीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असून, महायुतीच्या उमेदवारांना थेट जनतेसमोर सादर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. आगामी निवडणुकांत विकास, स्थैर्य आणि सुशासन या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित राहणार असल्याचे संकेत महायुतीकडून देण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आजच इचलकरंजी शहरात देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमधून मुख्यमंत्री थेट मतदारांशी संवाद साधणार असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. फडणवीसांच्या रोड शोसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून, महायुतीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

महापालिका निवडणुकीत महायुतीकडून राज्यभर आक्रमक प्रचाराची रणनीती आखण्यात आली असून, पहिली सभा सांगलीतून घेण्यामागे पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा राजकीय संदेश असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्येही देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या सभेने आणि रोड शोने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला गती मिळणार असून, विरोधकांच्या रणनीतींकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: बीएमसी निवडणूक प्रचारासाठी 15 लाखांची मर्यादा; दरसूचीमुळे उमेदवारांची कसरत