मुबई. Municipal Election 2026: मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज जाहीर प्रचाराची मुदत संपत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र मतदानाच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज महापालिका निवडणुकाचा प्रचार थंडावणार असून प्रचार सभा, रॅली सगळे काही बंद होणार आहे.  निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार आज (13 जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या ताज्या निर्णयानुसार प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवार मतदारांना भेटू शकणार आहेत, मात्र त्यांना पक्षाची पत्रके वाटता येणार नाहीत. २ दिवसांपूर्वी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यात सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी जे उमेदवार आहेत त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा अजब निर्णय नमूद आहे. 

मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेस तसेच अन्य लोकांनीही यावर आक्षेप घेतला. याआधी अशा प्रकारे निवडणूक आयोगाने कधी निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आता असा अजब निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण -

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने हा आदेश आता काढला नसून 2012 पासून अमलात आहे. उमेदवार जमावबंदीच्या आदेशाचे पालन करून घरोघरी जाऊन मतदारांना भेटू शकतात व त्याच्याशी चर्चा करू शकतात.