जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: मागील अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या मुंबईकरांना गणरायाच्या आगमनावर दिलासा मिळाला आहे. शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना पावसानेही मुंबईकरांना सुखवले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीही साचले आहे. मात्र, पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता (Mumbai Weather Forecast)

 मुंबई शहर आणि उपनगर परिसरात सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील; मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह व ताशी 40-50 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची ही शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा यलो अलर्ट (Mumbai Weather Update Today)

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज आहे. IMD कडून मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सि अस राहण्याची शक्यता आहे. 

विमानतळ परिसरात साचले पाणी (Mumbai Rain Update)

    मुंबईत मुसळधार पावसानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. 

    नालासोपाऱ्यात पुन्हा साचले पाणी

    वसई-विरार भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नालासोपारा येथील सेंटर पार्क आणि तुळींज पुलासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे सकाळच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.