मुंबई. Mumbai Pune Expressway Missing Link Project: पुणे एक्सप्रेसवे वरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून या प्रकल्पाचे सुमारे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे आणि आवश्यक परवानग्या पूर्ण करून 1 मेपासून हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सध्या प्रकल्पातील रस्त्यांची रंगरंगोटी, चिन्हांकन आणि इतर अंतर्गत कामे वेगाने सुरू असून अंतिम तपासणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामध्ये बोगदे, उड्डाणपूल आणि नवीन मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहने अधिक सरळ आणि जलद मार्गाने प्रवास करू शकतील.
या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः घाट विभागातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, 1 मे रोजी प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज हजारो वाहनचालकांना याचा थेट फायदा होणार असून मुंबई–पुणे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
