मुंबई. मालाडच्या कुरार परिसरात 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जून 2022 मध्ये कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता मालाडमधील एका बंद डे-केअर सेंटरच्या फ्रीझरमध्ये ठेवला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कुरार पोलिसांचे पथक संबंधित डे-केअर सेंटरमध्ये पोहोचले. डॉक्टर सय्यद यांच्या देखरेखीखाली असलेल्या या सेंटरमधून पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेतला. तब्बल चार वर्षे मृतदेह अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आल्याने परिसरातही खळबळ उडाली आहे.
50 लाख रुपयांहून अधिक खर्च-
माहितीनुसार, मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास चार वर्षे मृतदेह जतन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आला. या संपूर्ण कालावधीत मृतदेह जतन करण्यासाठी कुटुंबीयांनी 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मृतदेह इतका काळ फ्रीझरमध्ये का ठेवण्यात आला, कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार का केले नाहीत आणि या प्रक्रियेसाठी नेमकी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याचा तपास कुरार पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यासंदर्भातील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
चार वर्षे मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवण्यामागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे. मृत व्यक्तीचा मृत्यू जून 2022 मध्ये झाल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणातील सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
