जेएनएन, मुंबई. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘डे केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे’ असा फलक असलेल्या बंद इमारतीमध्ये एका 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह तब्बल चार वर्षांपासून फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. परिसरात काही दिवसांपासून या ठिकाणाहून तीव्र दुर्गंधी येत होती. दुर्गंधी वाढत गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कुरार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता फ्रीझरमध्ये मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित वृद्धाचा मृत्यू जून 2022 मध्ये झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. काही वृत्तांनुसार त्यांना कर्करोग आणि इतर आजारही होते. त्यामुळे या प्रकरणात सध्या घातपाताचा संशय आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
फ्रीजरमध्ये मृतदेह का ठेवला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्यांच्याशी असलेल्या भावनिक जिव्हाळ्यामुळे मृतदेह जतन करून ठेवायचा होता. कुटुंबीयांनी क्रायोनिक्स या संकल्पनेबाबत माहिती घेतली होती. भविष्यातील वैद्यकीय किंवा वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याची शक्यता असल्याच्या विचारातून मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. कुटुंबीय मृतदेह अमेरिकेतील क्रायोनिक्स केंद्रात पाठविण्याच्या पर्यायाचाही विचार करत होते.
क्रायोनिक्समध्ये मृत्यूनंतर शरीर अत्यंत कमी तापमानात जतन करण्याची संकल्पना आहे. मात्र, क्रायोनिक्सच्या माध्यमातून मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येते, याला सध्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचारपद्धतीचा दर्जा नाही. त्यामुळे या प्रकरणातील कुटुंबीयांचा निर्णय आणि मृतदेह जतन करण्याची पद्धत याबाबत पोलिसांकडून कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत.
‘डे केअर सेंटर’च्या फलकामागे नेमकं काय?
ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला, ते ठिकाण बंद होते. इमारतीबाहेर ‘Daycare Centre – Opening Shortly’ असा फलक लावण्यात आला होता. संबंधित क्लिनिक गेल्या काही काळापासून बंद असून नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, परिसरातील रहिवाशांना बंद जागेतून सातत्याने दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. दुर्गंधी वाढल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर बंद गेट उघडून आत तपासणी करण्यात आली. त्यावेळी फ्रीजरमध्ये वृद्धाचा मृतदेह असल्याचे आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि मृत्यूशी संबंधित कागदपत्रे तपासण्यात आली.
पोलिसांकडून कायदेशीर बाबींचा तपास
या प्रकरणात मृत्यू नैसर्गिक असल्याचे प्राथमिक कागदपत्रांवरून समोर आले असले तरी, मृतदेह चार वर्षे खासगी ठिकाणी फ्रीझरमध्ये जतन करून ठेवण्याची कायदेशीर परवानगी आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. यासाठी संबंधित तज्ज्ञांकडून कायदेशीर आणि वैद्यकीय मत घेतले जात आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
