मुंबई. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांनी विजयाचा आनंद साजरा केला असला, तरी अनेक नगरसेवकांची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी विविध कारणांवरून विजयी नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले असून, तब्बल 79 निवडणूक याचिका दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेकडे केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जातून ही माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक याचिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात 24 याचिका दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपच्या विजयी नगरसेवकांविरोधात 16 याचिका दाखल असून, काँग्रेसच्या नगरसेवकांविरोधात 10 याचिका दाखल करण्यात आले आहेत.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात 7 याचिका, एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात 5 याचिका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांविरोधात 2 याचिका दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या निवडीलाही आव्हान देण्यात आले आहे.

पक्षनिहाय याचिकांची संख्या

* उद्धव ठाकरे यांची शिवसेना – 24

    * भाजप – 16

    * काँग्रेस – 10

    * एकनाथ शिंदे यांची शिवसेना – 7

    * एमआयएम – 5

    * मनसे – 2

    * राष्ट्रवादी काँग्रेस – 1

    निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या निवडीवर आक्षेप घेत ही निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नगरसेवक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही संबंधित विजयी उमेदवारांना आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

    मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीनंतर आता निवडणूक निकालांविरोधातील याचिकांमुळे राजकीय आणि कायदेशीर संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे.

    आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अर्जातून समोर आलेल्या या आकडेवारीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांपुढील कायदेशीर आव्हानांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक 24 याचिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात असल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.