जेएनएन, मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) पुनर्विकास कामाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेकडून 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत तब्बल 75 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 तसेच स्टेब्लिंग लाइन क्रमांक 15 या ठिकाणी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील रेल्वे वाहतूक बंद राहणार असून, लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  

पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील काम 

रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) मार्फत CSMT पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ही कामे केली जात आहेत. ब्लॉकच्या काळात प्लॅटफॉर्म आणि स्टेब्लिंग लाइनशी संबंधित पायाभरणी तसेच अन्य आवश्यक बांधकामाची कामे केली जाणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 पुन्हा रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  

आठ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन 

या ब्लॉकचा थेट परिणाम CSMTला येणाऱ्या काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. सात गाड्या दादर येथे, तर एक गाडी ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे. त्यामुळे CSMTपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना दादर किंवा ठाणे येथून पुढील प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

    माहितीनुसार प्रभावित गाड्या पुढीलप्रमाणे. 

    दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या : 

    • 11002 बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्स्प्रेस
    • 12810 हावडा–CSMT एक्स्प्रेस
    • 12112 अमरावती–CSMT एक्स्प्रेस
    • 11020 भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्स्प्रेस
    • 22120 मडगाव–CSMT तेजस एक्स्प्रेस
    • 22144 बिदर–CSMT एक्स्प्रेस
    • 22108 लातूर–CSMT एक्स्प्रेस

    ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी :

    • 12134 मंगळुरू–CSMT एक्स्प्रेस

    प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे

    CSMT हे मुंबईतील प्रमुख टर्मिनस असल्याने या 75 दिवसांच्या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः दिवाळी आणि छठपूजेच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईतून बाहेरगावी प्रवास करतात. त्यामुळे प्रभावित गाड्यांच्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक आणि गाडीचे टर्मिनेशन स्टेशन तपासणे महत्त्वाचे आहे.