जेएनएन, मुंबई. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून, पुढील काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राठी हा इशारा देण्यात आला आहे. मात्र, 1 ऑक्टोबरनंतर या भागासाठी स्वतंत्र इशारा नसल्याचे विभागाच्या उपविभागीय अंदाजातून दिसून येते.

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात लक्ष

कोकणातील सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणामुळे दुपार, सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. सातारा शहरासाठीच्या हवामान अंदाजातही 30 सप्टेंबरला दुपार,सायंकाळी मेघगर्जनेसह सरींची शक्यता नोंदवण्यात आली आहे.

मुंबईतही पावसाची हजेरी

मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबई विभागासाठी 30 सप्टेंबरला मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 28 सप्टेंबरच्या नोंदीनुसार अलिबाग येथे 73 मिमी आणि दहाणू येथे 70 मिमी पावसाची नोंद झाली होती, त्यामुळे कोकण पट्ट्यातील पावसाची सक्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. 

    परतीचा मान्सून

    मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी त्याचा अर्थ राज्यात पाऊस तातडीने पूर्णपणे थांबेल असा नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या माघारीसाठी पावसातील सातत्यपूर्ण घट, वातावरणातील आर्द्रता कमी होणे आणि वाऱ्यांच्या दिशेतील बदल यांसारखे निकष विचारात घेतले जातात. त्यामुळे परतीच्या टप्प्यातही काही भागांत स्थानिक हवामान परिस्थितीनुसार पाऊस होऊ शकतो.

    शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

    राज्यातील अनेक भागांत खरीप पिकांची काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे विजांसह पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या स्थानिक सूचनांकडे लक्ष ठेवावे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या शेतात विद्युत खांबाजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.