जेएनएन, मुंबई. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या राखीव निधीत घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या (फिक्स्ड डिपॉझिट) स्वरूपातील राखीव निधीत तब्बल 3 हजार 544 कोटी रुपयांची घट झाली आहे. फेब्रुवारीत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी 81 हजार 449 कोटी रुपये असलेला हा निधी आता 77 हजार 905 कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत आणि वाढत्या खर्चाच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पाच वर्षांत जवळपास 13 हजार 800 कोटींची घट
मुंबई महापालिकेच्या तिमाही आर्थिक अहवालानुसार, सध्या महापालिकेकडे मुदत ठेवींच्या स्वरूपात 77 हजार 905 कोटी रुपयांचा राखीव निधी आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात हा निधी 81 हजार 449 कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीत त्यात 3 हजार 544 कोटी रुपयांची घट झाली आहे.
महापालिकेच्या राखीव निधीचा मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास घट अधिक स्पष्ट होते. 2021 मध्ये महापालिकेकडे 91 हजार 670 कोटी रुपयांचा राखीव निधी होता. त्या तुलनेत सध्याचा निधी जवळपास 13 हजार 765 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीत राखीव निधीत सुमारे 15 टक्क्यांची घट झाली आहे.
विकासकामांवरील खर्चाचा परिणाम?
मुंबई महापालिका शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली जाते. अशा खर्चासाठी महापालिकेच्या उत्पन्नाचा आणि उपलब्ध राखीव निधीचा वापर होऊ शकतो.
