एजन्सी, मुंबई. Mumbai Rain Latest Update: आज सकाळी मुंबईत हलक्या सरींसह पाऊस पडला, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज आकाश ढगाळ राहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या 48 तासांत मुंबईसह परिसरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी कोकण आणि गोव्यातही पाऊस पडला, पणजी (उत्तर गोवा) येथे 9 सेमी आणि मुंबई (सांताक्रूझ) आणि रत्नागिरी (रत्नागिरी) येथे प्रत्येकी 3 सेमी पाऊस पडला.
राज्यात अलर्ट
कोकण विभागातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंद्धुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर नाशिक, मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशीव जिल्ह्यांना येलो अलर्ट तर छत्रपती संभाजीनगरला जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.