जेएनएन, मुंबई. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई आणि परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून, या ‘ऑक्टोबर हीट’चा परिणाम आता रेल्वे वाहतुकीवरही दिसून आला आहे. अतिउष्णतेमुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्याने मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी फटका बसला. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाला तीन ठिकाणी तातडीने 10 ते 15 मिनिटांचे आपत्कालीन ब्लॉक घ्यावे लागले. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला, तर काही फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत.

उष्णतेमुळे नागरिक हैराण 

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाणवणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, त्याचा परिणाम रेल्वेच्या पायाभूत सुविधांवरही झाला. रेल्वे रूळ हे उन्हामुळे तापल्यावर धातूच्या प्रसरणामुळे त्यांच्या आकारमानात बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत रेल्वेची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केला जातात.

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांची तपासणी

मंगळवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनवर काही ठिकाणी रेल्वे रूळ प्रसरण पावल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित ठिकाणी तातडीने ब्लॉक घेण्यात आले. या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांची तपासणी आणि आवश्यक तांत्रिक कार्यवाही करण्यात आली. 

काही फेऱ्या रद्द 

    या आपत्कालीन ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. काही लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या, तर काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. काही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली, तर लोकलच्या वेळापत्रकातही विस्कळीतपणा निर्माण झाला. 

    दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे रुळांची नियमित पाहणी केली जात आहे. तापमानात मोठी वाढ झाल्यास रुळांच्या स्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाते. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये आणि लोकल सेवा सुरक्षितपणे सुरू राहावी, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी खबरदारीचे ब्लॉक घेण्यात येणार आहे.