जेएनएन, मुंबई: मुंबई उपनगरात लोकल रेल्वे ही लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य आधार आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला (Mumbai Local Accident) आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंपैकी केवळ 1400 मृत प्रवाशांच्या वारसांनाच आर्थिक मदत देण्यात आली आहे. या मदतीची एकूण रक्कम सुमारे 103 कोटी रुपये इतकी आहे.
अपघात होण्याची मुख्य कारणे!
उपनगरी रेल्वेच्या एका डब्यात साधारण 1800 प्रवाशांची क्षमता आहे.प्रत्यक्षात क्षमतेपेक्षा 2-3 पट अधिक प्रवासी डब्यांमध्ये प्रवास करतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की, घसरण किंवा रेल्वे रुळावर पडून मृत्यूच्या घटना घडतात.
लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दी, अपुऱ्या सोयी-सुविधा, वेळेवर गाड्या न मिळणे, तसेच प्लॅटफॉर्मवरील अडचणी, या सर्व कारणांमुळे गेल्या दोन दशकांमध्ये हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
मुंबई लोकल रेल्वे विषयी
मुंबई लोकल ही मुंबई शहराची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक कामासाठी आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. मुंबई लोकलच्या प्रमुख तीन लाईन्स आहेत, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पासून कर्जत/कसारा पर्यंत लोकल धावतात तर पश्चिम रेल्वेवर (Western Line) चर्चगेट पासून विरार पर्यंत लोकल धावतात. हार्बर लाईन (Harbour Line) वर सीएसएमटी पासून पनवेल आणि गोरेगाव पर्यंत लोकल धावतात. यातून लाखो प्रवाशी दररोज प्रवास करतात.