जेएनएन, मुंबई. मुंबईच्या वरळीत होळी उत्सवानिमित्त यंदा टोरेस घोटाळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे. वीर नेताजी क्रीडा मंडळा तर्फे हा देखावा उभारण्यात आला असून, या घोटाळ्याविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे. याआधीच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरील देखाव्यांप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्याचा संदेश यामधून दिला जात आहे.

टोरेस घोटाळ्यावर 50 फूट उंच देखावा 

मुंबईच्या वरळीत वीर नेताजी क्रीडा मंडळ गेली 42 वर्षे होळीच्या निमित्ताने विविध विषयांवर आधारित देखावे साकारत आहे. यंदा त्यांनी टोरेस घोटाळा या गाजलेल्या घोटाळ्यावर 50 फूट उंच देखावा उभारला आहे. 

अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक 

गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

    आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

    टोरेस घोटाळा हा मुंबईत उघडकीस आलेला एक मोठा आर्थिक घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये 'टोरेस' नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि नंतर कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक फरार झाले, याप्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

    3 लाख मुंबईकरांची फसवणूक

    या घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून अंदाजे 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आहे.