जेएनएन, मुंबई: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ 10 मार्च 2025 रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून 11 मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजुरांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. उर्वरीत आठ मजुरांवर एम. जी. एम. हॉस्पीटल, छत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटल, चाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड ता. कन्नड येथील रहिवाशी आहेत.
ऊस तोडणी व वाहतुक करतांना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्ष, अपंगत्व आल्यास 2.50 लक्ष व जखमींना उपचारासाठी 50 हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतो, असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.