रत्नागिरी. Mumbai-Goa Highway News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या तब्बल 18 वर्षांपासून रखडलेल्या चिपळूण येथील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता आहे. गुरुवारी या पुलाच्या दोन्ही मार्गिकांवरून वाहनांची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे लवकरच हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध तांत्रिक अडचणी, प्रशासकीय विलंब आणि बांधकामातील अडथळ्यांमुळे या महामार्गावरील अनेक कामे रखडली होती. त्यात चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाचाही समावेश होता. या पुलाचे काम दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने स्थानिक नागरिकांसह मुंबई, कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

दोन्ही मार्गिकांवर वाहनांची ट्रायल

बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या बांधकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दोन्ही मार्गिकांवरून वाहनांची ट्रायल घेण्यात आली. शुक्रवार २७ नोव्हेंबरला देखील ट्रायल वाहतूक घेतली जाणार आहे. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी 30 नोव्हेंबर पासून खुला करण्याचे नियोजन राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात आले आहे. या चाचणीदरम्यान पुलावरील वाहतुकीची स्थिती आणि मार्गिकांची कार्यक्षमता तपासण्यात आली. दोन्ही बाजूंनी वाहने चालवून पुलाची चाचणी घेण्यात आल्याने प्रत्यक्ष वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूल पूर्ण

बहादूरशेख नाका हा चिपळूण शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारी वाहने आणि स्थानिक वाहतूक यांचा मोठा भार या परिसरावर असतो. त्यामुळे येथे उड्डाणपुलाची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. अखेर 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे.

    चिपळूणमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

    बहादूरशेख नाका परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होते. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर महामार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक उड्डाणपुलावरून वळवता येईल. त्यामुळे चिपळूण शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

    कोकण प्रवास अधिक सुसाट होणार?

    मुंबई-गोवा महामार्ग हा मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. बहादूरशेख नाका उड्डाणपूल सुरू झाल्यास चिपळूणमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. मात्र, पुलावरील नियमित वाहतूक सुरू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक तपासणी आणि प्रशासकीय परवानग्या लवकरच मिळणार आहे.

    आता 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होणार, याकडे कोकणवासीय आणि मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.