जेएनएन, मुंबई. धारावीतील रस्ते विकासाच्या कामासाठी तब्बल 210 झाडे बाधित होणार आहेत. यामध्ये 67 झाडे तोडण्यात येणार असून, 143 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बाधित झाडांमध्ये तीन वारसावृक्षांचाही समावेश आहे. धारावीतील रस्त्यांच्या विकासासाठी मुंबईतील झाडांवर कुऱ्हाड चालणार असताना, त्याच्या बदल्यात हजारो झाडांची लागवड मात्र मुंबईबाहेर पालघर जिल्ह्यात केली जाणार आहे.

या प्रस्तावानुसार, तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात 3 हजार 78 नवीन झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील पोचाडे आणि तामसई या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 18 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार आहे.

धारावीतील दोन स्वतंत्र प्रकल्पांमुळे झाडांवर परिणाम

या प्रस्तावात दोन वेगवेगळ्या कामांचा समावेश आहे.

  1. जी/उत्तर विभागातील 20 मीटर रुंद रस्ता :

धारावीतील शहर सर्वेक्षण क्रमांक 2, 4 आणि 62 अंतर्गत इमारतींच्या पुनर्बांधणीसह प्रस्तावित 20 मीटर रुंद रस्त्याच्या कामामुळे एकूण 75 झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी 14 झाडे तोडली जाणार असून, 61 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या परिसरातील एकूण 334 झाडांपैकी 259 झाडे कायम ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, बाधित होणाऱ्या 75 झाडांमध्ये तीन वारसावृक्षांचा समावेश आहे.

  1. आरपीएफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसरातील वाहनमार्ग :

धारावीतील आरपीएफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसरात रेल्वेच्या परिचालन सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित वाहनमार्गामुळे 135 झाडे बाधित होणार आहेत. यापैकी 53 झाडे तोडली जाणार असून, 82 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या परिसरातील एकूण 393 झाडांपैकी उर्वरित 258 झाडे सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

    पालघरमध्ये 18 हेक्टरवर 3 हजार 78 झाडांची लागवड

    धारावीतील झाडांच्या नुकसानीची भरपाई म्हणून विकासकाकडून पालघर जिल्ह्यात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठिकाणी एकूण 18 हेक्टर जागेची निवड करण्यात आली आहे. 

    • पोचाडे आणि तामसई : आठ हेक्टर जागेवर 961 झाडांची लागवड.
    • अक्करपट्टी : दहा हेक्टर जागेवर 2 हजार 117 झाडांची लागवड. 

    अशा प्रकारे एकूण 3 हजार 78 झाडे लावण्याचे नियोजन आहे. वृक्षतोड किंवा पुनर्रोपणानंतर 15 दिवसांच्या आत नवीन झाडांची लागवड करावी लागणार आहे. ही रोपे किमान सहा फूट उंचीची असावीत आणि स्थानिक प्रजातींच्या झाडांना प्राधान्य द्यावे, अशी अट प्रस्तावात आहे.

    सात वर्षे विकासकाकडे देखभालीची जबाबदारी

    केवळ वृक्षलागवड करून जबाबदारी संपणार नाही, तर नव्याने लावलेल्या झाडांचे संवर्धन करणेही आवश्यक असणार आहे. त्यानुसार लागवड केलेल्या झाडांची पुढील सात वर्षे देखभाल आणि संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित विकासकावर राहणार आहे. झाडांची वाढ, त्यांचे अस्तित्व आणि संवर्धन करण्याची जबाबदारी विकासावर असणार आहे.