जेएमएन, मुंबई. Mumbai News: मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील एका सिमेंट कंपनीत सुरु असलेल्या ड्रग्ज कारखाना उद्धवस्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याठिकाणाहून 8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे.

तिघांना अटक 

वसईतील एका सिमेंट कंपनीतील एमडी ड्रग्ज कारखान्यावर साकीनाका पोलिसांनी छापा टाकला, 8 कोटी रुपये किमतीचे 4 किलो ड्रग्ज जप्त केले. सादिक शेख, सिराज पंजवानी आणि सय्यद इराणी या तिघांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ड्रग्ज विकण्याचा कट रचल्याची माहिती 

24 एप्रिल रोजी साकीनाका पोलिस ठाण्याला एका व्यक्तीने ड्रग्ज विकण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. संशयिताला अटक केल्यानंतर, अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे 53 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

    8.04 कोटी रुपयांचे ड्रग्ज

     चौकशीनंतर, वसईतील एमके ग्रीन फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला, जिथे सुमारे 4 किलो एमडी ड्रग्ज, दोन रेफ्रिजरेटर आणि ड्रग्ज उत्पादनासाठी वापरले जाणारे सेंट्रीफ्यूगल मशीन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 8.04 कोटी रुपये आहे, असं पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितलं.

    हेही वाचा - Navi Mumbai News:  4 वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार, पालकांचे शाळेसमोर आंदोलन